Sunday, October 12, 2008

फोटोशॉप लेअर्स-1

नमस्कार मित्रांनो,
आजपासून आपण फोटोशॉपच्या लेअर्सची माहिती घेणार आहोत. नव्यानी फोटोशॉप शिकणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. लेअर्स ही कन्सेप्ट फोटोशॉप 3.0 पासून सुरू झाली आणि या लेअर्सनी फोटोशॉपमध्ये क्रांती घडवली. फोटोशॉपच्या सगळ्यात पॉवरफूल फिचर्सपैकी एक म्हणजे लेअर्स. आज लेअर्सशिवाय फोटोशॉपमध्ये डिझाइनींग करण्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही.
लेअर्सचा वापर खूप प्रकारे आणि विविध गोष्टींसाठी करता येतो. पण त्यासाठी लेअर्सवर मास्टरी येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल. चला तर मग आता लेअर्सची माहिती घेऊ.
लेअर्स म्हणजे काय?
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, लेअर्स म्हणजे फोटोशॉपमध्ये एकावर एक ठेवलेल्या इमेज. या सगळ्या इमेज मिळून एक इमेज तयार होते. यातल्या प्रत्येक इमेजवर तुम्ही इतर इमेजेस खराब न करता स्वतंत्रपणे काम करू शकता.
उदाहरणार्थ... मी एका कागदावर लाल रंगाचा एक चौकोन काढला. त्याच्यावर एक ट्रान्स्परंट पेपर ठेऊन त्याच्यावर एक पिवळा गोल काढला. परत त्याच्यावर एक ट्रान्स्परंट पेपर ठेऊन त्याच्यावर निळ्या रंगात काही अक्षरे लिहीली. हे पेपर्स म्हणजेच लेअर्स. सगळ्यात खालचा लाल चौकोन ही माझी बॅकग्राऊंड इमेज झाली (लेअर क्र.1 ). त्यावर असलेला पिवळा गोल म्हणजे एक स्वतंत्र लेअर झाला (लेअर क्र. 2). आणि सगळ्यात वरची अक्षरे हा आणखी एक स्वतंत्र लेअर झाला  (लेअर क्र.3). आता हे लेअर्स तुम्ही स्वतंत्रपणे एडिट करू शकता. त्यांना खालीवर करू शकता. ही कन्सेप्ट म्हणजेच लेअर्स. आहे की नाही सोपं. (आकृती बघा).


पुढच्या पोस्टमध्ये हे लेअर्स कंट्रोल करणाऱ्या फोटोशॉपच्या लेअर्स पॅलेटची माहिती घेऊ.
kiran.velhankar@gmail.com

No comments: