Tuesday, September 30, 2008

इन्फोग्राफिक 2

आता थोडक्‍यात इन्फोग्राफिक म्हणजे काय हे तुम्हाला कळालं असेल असं गृहीत धरतो. तसं बघितलं तर इन्फोग्राफिकची सुरुवात फार पूर्वीपासून झाली असं म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ म्हणजे खाली दिलेलं चित्रे पाहा.




जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची याने काढलेली ही चित्रे. कोणतीही आधुनिक सामग्री उपलब्ध नसताना हे अशा प्रकारचे परफेक्‍ट ड्रॉइंग काढणे म्हणजे.. केवळ ग्रेट! चित्र आणि माहिती (शब्द) यांचा एकत्रित वापर इथे बघायला मिळतो.
क्‍लिष्ट, सहजपणे न कळणाऱ्या गोष्टी सोपेपणाने इन्फोग्राफिक्‍सच्या माध्यमातून मांडता येतात. परंतु, केवळ लिखित मजकूर जशाच्या तशा "इलस्ट्रेशन'च्या स्वरूपात मांडणे म्हणजे "इन्फोग्राफिक' नव्हे. माहितीची सुत्रबद्ध मांडणी, त्यातील घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध याद्वारे सुसंबंधित माहिती वाचकांपर्यंत पोचविणे "ग्राफिक्‍स'मध्ये अपेक्षित आहे. तुम्हाला सगळ्यांना सध्या चर्चेत असलेला ग्रीन हाऊस इफेक्‍ट किंवा मराठीत हरितगृह परिणाम याची माहिती असेल. पण आता ही सगळी शास्त्रीय माहिती म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्‍ट म्हणजे नक्की काय? तो कशामुळे होतो? त्याचा परिणाम पृथ्वी, मानव, वनस्पती यांच्यावर काय होतो. हे सगळं शब्दांत सांगायचं म्हणजे????? नकोच ते.
हीच माहीती इन्फोग्राफिकच्या माध्यमातून लोकांपुढे मांडली तर ती किती सोपी होते ते खालच्या चित्रात पाहा.



नुसती माहितीच नाही तर, एखादी घटनासुद्धा तुम्ही ती घटना कशी घडली हे इन्फोग्राफिकच्या माध्यमातून लोकांना दाखवू शकता. खालील चित्र पाहा. World Trade Center झालेल्या हल्ल्यांची घटना सांगणारे हे इन्फोग्राफिक आहे.



आज एवढंच. आता पुढच्या पोस्टपासून इन्फोग्राफिक्‍सचे प्रकार कोणते? ते तयार करताना काय काळजी घ्यावी लागते याची माहिती घेऊ.

Friday, September 26, 2008

नमस्कार मित्रांनो

सर्वप्रथम माफी मागतो, नवीन पोस्ट न टाकल्याबद्दल. पण नाईलाज आहे. चांगलाच आजारी पडलोय. अजून दोन दिवस तरी काही नवीन पोस्ट टाकता येइल अशी शक्यता दिसत नाहीये. सोमवारपासून पुन्हा नियमित लेखन करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा माफी मागतो.
भेटू तर मग पुन्हा सोमवारपासून.....

Thursday, September 25, 2008

अक्षर अवयव

योग्य पद्धतीने लेखणी धरली आहें याची खात्री झाल्यानंतर आपण अक्षरांच्या अवयवांबद्दल माहिती करून घेऊ. खालील चित्रावरून आपल्याला अक्षरांचे अवयव समजतील. हे अवयव काढण्याचा सराव केल्यास त्यावरून सुलेखन करणे सोपे जाईल.

अक्षरउंची
देवनागरी लिपी लिहिताना तुम्ही ज्या कटनीब किंवा मार्करचा वापर करणार आहात त्या साधनापासून काढलेल्या शिरोरेषेच्या जाडीच्या आठ पट अक्षरांची उंची असावी. मात्रा आणि उकार यांना ती चार पट असावी. यासाठी खालील आकृती पाहा.
Thanks Prabhakar
For more info: prabhakar.bhosale@gmail.com

Wednesday, September 24, 2008

लेखनसाहित्य

देवनागरी लिहण्यासाठी बाजारात कटनिब, मार्कर, बोरू सहजासहजी उपलब्ध आहेत. आईसकॅंडीमधील लाकडी चपटी काडीला शेजारी दाखविल्याप्रमाणे काप घेतल्यास त्यानेही तुम्ही देवनागरी लिहू शकता. कापाची जाडी कमी जास्त ही करता येते. सराव करण्यासाठी ग्राफ पेपरचा वापर करावा. म्हणजे अक्षरांच्या शिरोरेषा आणि दंड काटकोनात येण्यास मदत होईल.


लेखनपद्धत
देवनागरी लिपीतील अक्षरांचा ओघ हा वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असतो. देवनागरी वळणे अचूक आणि आकर्षक येण्यासाठी शेजारील आकृतीवरून आपण देवनागरी लिहिण्यासाठी लेखणी नीट धरली आहे की नाही याची खात्री होईल.

Thanks Prabhakar
For more info: prabhakar.bhosale@gmail.com

Tuesday, September 23, 2008

इन्फोग्राफिक्‍स...

नमस्कार दोस्तांनो...

तुमच्यापैकी जे आर्टिस्ट वर्तमानपत्राशी संबंधित आहेत ते या शब्दाशी परिचित असतील. इतरांना हा प्रकार माहित असण्याचं फारसं कारण नाही; पण इन्फोग्राफिक हा प्रकार इतका इंटरेस्टिंग आहे की बस. पण त्यासाठी इन्फोग्राफिक म्हणजे काय ते कसे तयार करायचे आणि ते कसे बघायचे या सगळ्यामागे एक शास्त्र आहे. थांबा! घाबरू नका शास्त्र म्हणजे थोडं अवघड होतय ना!. मग आपण त्याला पद्धत असं म्हणू. एकदा की ही पद्धत तुम्हाला समजली की झालं. तुम्ही माझ्याइतकाच त्याचा आनंद घ्यायला लागाल. मला स्वतःला इन्फग्राफिक्‍समधले फार काही कळत नव्हतं. "सकाळ'मध्ये न्यूजपेपर आर्टिस्ट म्हणून काम करताना प्रसिद्ध इन्फोग्राफर पीटर आँग आणि 'न्यूज विक'चे आर्ट डिरेक्‍टर कार्ल गुड यांच्याबरोबर त्यांच्या वर्कशॉपमध्ये, सेमिनारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलून गेला.
फार बडबड झाली नाही का.... आता प्रत्यक्ष विषयाकडे जाऊ.. (एका किंवा दोन पोस्टमध्ये हा विषय कव्हर होणारा नसल्यामुळे तुम्हाला बऱ्याच संयमाची आवश्‍यकता आहे.)


इन्फोग्राफिक म्हणजे काय?

इन्फोग्राफिकची अगदी सोपी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल..चित्र, शब्द आणि छायाचित्र यांची एकत्रितरित्या केलेली मांडणी म्हणजे इन्फोग्राफिक की ज्याद्वारे वाचकाला, तो वाचत असलेल्या गोष्टीची माहिती कमीत कमी शब्दात आणि कमी वेळेत पण अधिक चांगली मिळावी. आता तुम्ही म्हणाल की हे का झेंगट आहे? थांबा, उदाहरणासह सांगतो. ज्यावेळी अॅपल कंपनीनी आयफोन लॉंच केला त्यावेळी संपूर्ण जगभरात त्याविषयी उत्सूकता होती. आता जर का मला ही माहिती तुम्हाला शब्दांत सांगायची झाली तर एकवेळ भरपूर मोठ्ठी माहिती मी लिहू पण शकेन पण.... ती तुम्हाला वाचायला आवडेल? आणि ती किती समजेल? पण समजा हीच माहिती मी तुम्हाला दाखलवी तर?????... हेच इन्फोग्राफिक.. खालील इन्फोग्राफिक बघा.


यामध्ये आयफोन कसा आहे? तो कसा दिसतो? त्याची वैशिष्टे काय? ही सगळी माहिती आहे पण मुख्य म्हणजे ती तुम्हाला दिसतीये सुद्धा. एखादी माहिती शब्दांतून सांगण्यापेक्षाती प्रत्यक्ष दाखवणं म्हणजेच इन्फोग्राफिक..... हूशऽऽऽऽऽऽ... आज इथेच थांबू. पुढील माहिती लवकरंच... विषय आवडला असेल (नसेल) तर जरूर कॉमेंट करा. किंवा मेल करा.. kiran.velhankar@gmail.com

लेखणी पकडावी कशी?

देवनागरी लिहिताना लेखणीची पकड योग्य प्रकारे नसेल तर देवनागरी लिपीतील गोडवा नाहीसा होतो. अक्षरांमधील जाड आणि नितळ फाटे हे लेखणी योग्य पद्धतीने पकडले तरच साध्य करता येतात. शेजारील आकृतीत देवनागरी लिहिताना लेखणी कशी पकडावी हे दाखविले आहे. लेखणी पकडण्याची योग्य पद्धत ही अक्षर सुधारण्यासाठी सर्वांत महत्त्वाची ठरते.

Thanks Prabhakar.

Monday, September 22, 2008

फोटोशॉपमध्ये पाण्याचा थेंब

नमस्कार मित्रांनो,
आज आपण फोटोशॉपचा वापर करून पाण्याचा थेंब कसा तयार करायचा ते बघूयात. सगळ्यात आधी ज्या इमेजवर तुम्हाला हा थेंब तयार करायचा आहे ती इमेज ओपन करा. मी इथे त्यासाठी एका पानाचा फोटो निवडला आहे. फोटो ओपन झाल्यावर पुढे दिल्याप्रमाणे कृती करत जा.
1) इमेज वर एक नवीन लेअर ऍड करून त्यावर एलिप्टिकल मॉर्की टूलचा ( Elliptcal Marqee Tool) वापर करून तुम्हाला ज्या आकाराचा थेंब तयार करायचा आहे त्या आकाराचा एरिया सिलेक्‍ट करा. अर्थात तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचा थेंब तयार करू शकता.














2) आता किबोर्डवरील D ही की दाबा. त्यामुळे बॅकग्राउंड कलर व्हाईट आणि फोरग्राऊंड कलर ब्लॅक होईल.
3) सिलेक्‍शन अॅक्‍टीव असतानाच ग्रेडीयंट टूल सिलेक्‍ट करून त्यामधील लिनिअर ग्रेडियंट हा ऑप्शन सिलेक्‍ट करा. सगळं सांगितल्याप्रमाणे झालं असेल तर तुम्हाला पुढीलप्रमाणे ग्रेडियंट टूलबार दिसेल.


4) टूलचा वापर करण्याआधी ग्रेडियंट डावीकडून उजवीकडे (डार्क टू लाईट) जात आहे ना याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर ग्रेडियंट टूलबारवरील सगळ्यात उजवीकडील रिव्हर्स हा ऑप्शन डिसिलेक्‍ट असला पाहिजे. जर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाऊट ग्रेडियंट दिसत नसेल तर ग्रेडियंट ऑप्शन्सवर क्‍लिक करून त्यातील ब्लॅक अँड व्हाईट ग्रेडियंट ऑप्शन सिलेक्‍ट करा.
5 ) आता ग्रेडियंट तयार करू. आकृतीत दाखविलेल्या अँगलप्रमाणे लेफ्ट टू राईट ग्रेडियंट तयार करा.









6) ग्रेडियंट फिल झाल्यावर कंट्रोल की दाबून ठेऊन D प्रेस करा (ctr+D). त्यामुळे सिलेक्‍ट केलेला एरिया डिसिलेक्‍ट होईल.
7) आता या लेअरला ट्रान्स्परन्ट करण्यासाठी लेअर पॅलेटवरील ब्लेंडींग मोड ओव्हरले (overlay) ला सेट करा.









8) लेअर पॅलेट ऑप्शनवरील लेअर स्टाईल आयकॉनवर क्‍लिक करून लेअर स्टाईल विंडो ओपन करा. त्यापैकी ड्रॉप शॅडो ऑप्शन सिलेक्‍ट करून पुढे दाखवल्याप्रमाणे सेटिंग्ज करा.

9) आता इनर शॅडो ऑप्शन सिलेक्‍ट करून खाली दाखविल्याप्रमाणे सेटिंग्ज करा.


तुम्ही करत असलेला पाण्याचा थेंब खाली दाखविल्याप्रमाणे दिसला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट... तुम्ही घेतलेली बॅकग्राऊंड आणि पाण्याच्या थेंबाचा आकार लक्षात घेऊन तुम्हाला या सेटींग्जमध्ये कमीअधिक चेंजेस करावे लागण्याची शक्‍यता आहे.













आता या थेंबाला जिवंतपणा आणण्यासाठी त्यावर हायलाईट देऊया.

10) आता यावेळी किबोर्डवरील X हि कि प्रेस करा. यामुळे फोरग्राऊंडचा कलर बॅकग्राउंडला आणि बॅकग्राउंडचा कलर फोरग्राउंडला येईल. म्हणजे आता व्हाईट हा तुमचा फोरग्राऊंड कलर असेल. आता एक हार्ड ब्रश सिलेक्‍ट करा. साईज 6 पिक्‍सेल असावा. (अर्थात हा साईज तुमच्या थेंबाच्या साईजवर अवलंबून आहे.) एक नवील लेअर अॅड करा. या नवीन लेअरवर या ब्रशने थेंबाच्या वरच्या बाजूला डाविकडे दाखवल्याप्रमाणे क्‍लिक करून हायलाईट अॅड करा. बस... झाला तुमचा पाण्याचा थेंब तयार.













मला माहित असलेली ही सोपी पद्धत. यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला माहित असेल तर जरूर कळवा.

काही टिप्स.

1) शक्‍यतो पाण्याचा थेंब आणि हायलाईट तयार करताना लेअर ग्रुपचा वापर करणं अधिक सोयिस्कर आहे. लेअर ग्रुप मुळे तुम्ही हा लेअर ग्रुप वेगळ्या लेअरवर सहज कॉपी करू शकता. त्याचप्रमाणे हा लेअर ग्रुप तुम्ही मुव्ह टूलचा वापर करून हलवू शकता. तसेच ट्रान्सफॉर्म कमांड वापरून त्याला लहान मोठाही अगदी सहज करू शकता. (लहान- मोठा आकार करताना शिफ्ट की दाबून ठेवायला विसरू नका).

2) थेंबाचा आकार लहान- मोठा केल्यावर त्याप्रमाणे ड्रॉप शॅडोचा आकार बदलायला विसरू नका.
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. लवकरच भेटूयात आणखी काही अशाच सोप्या गोष्टींसह.

थोडे देवनागरीविषयी...

प्राचीन काळात भारतात दोन लिपी वापरल्या जात होत्या. त्यांपैकी एक ब्राह्मी आणि दुसरी म्हणजे खरोषी. ब्राह्मी लिपीची अक्षरे डावीकडून उजवीकडे जातात, तर खरोषी लिपीची अक्षरे उजवीकडून डावीकडे जात होती. ब्राह्मी लिपीत वेगवेगळ्या शतकांत बदल होत गेले. ब्राह्मीची सुधारित लिपी म्हणजेच आज आपण वापरतो ती देवनागरी लिपी होय.


लेखणी
आता देवनागरी लिहिण्यासाठी कशा प्रकारची लेखणी लागते ते पाहू.... देवनागरी अक्षरलेखनाचे भरपूर प्रकारचे साहित्य स्वस्तात बाजारात सहज उपलब्ध आहे. त्यामध्ये बोरू, कटमार्कर, कटनीब यांचा प्रामुख्याने वापर करता येईल. या साधनांचा उलटा आणि सुलटा वापर करता येतो. खालील आकृतीत मराठी आणि इंग्रजी अक्षरलेखनासाठी एकाच मार्करचा उपयोग कसा करता येईल हे दाखविले आहे.



Thanks Prabhakar.
for more information...prabhakar.bhosale@gmail.com

Sunday, September 21, 2008

अल्फा चॅनेलची उपयुक्तता आणि वापर

नमस्कार मित्रांनो,
आज आपण फोटोशॉपच्या अल्फा चॅनेलची माहिती घेऊ. त्याआधी याचा वापर कुठे आणि कशासाठी होतो ते पाहू. समजा तुम्ही एका इमेजवर काम करताय आणि त्या इमेज मधला काही भाग तुम्ही सिलेकट करताय कटआऊटसाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी. काळजीपूर्वक सिलेकशन करण्यासाठी तुम्ही तुमची किमान 10 ते 15 मिनीटे नक्की घालवणार. आता या सिलेक्‍ट केलेल्या भागावर तुम्ही परत 10 मिनीटे काम केलं आणि चूकून हा सिलेक्‍टेड एरिया डिसिलेक्‍ट झाला किंवा रिसाईज करण्यापूर्वी स्ट्रोक ऍप्लाय करायला विसरलात ........ पुन्हा 20 मिनीटे तेच काम.
ही सगळी रि-सिलेक्‍टींगची प्रोसेस तुम्ही टाळू शकला असतात जर तुम्ही अल्फा चॅनेलचा वापर तुमचं सिलेक्‍शन सेव्ह करण्यासाठी केला असतात तर. (खालील इमेज बघा.)



इथे एका इमेचचा काही भाग सिलेक्‍ट केला आहे. यासाठी किमान 5 मिनीटं लागली आहेत. आणि मला पुन्हा आणखी 5 मिनीटं परत हेच सिलेकशन करण्यात घालवायची इच्छा अजिबात नाहीये. तुम्ही कष्टपूर्वक केलेलं सिलेक्‍शन कायमस्वरूपी सेव्ह करू शकता. आणि पुन्हा पुन्हा, कितीही वेळा त्याचा वापर करू शकता. कसं ते आपण पाहू.
1. मेन्यूबारवरील सिलेक्‍ट मेन्यू सिलेक्‍ट करा. आणि त्यातील सेव्ह सिलेक्‍शन या सबमेन्यूवर क्‍लिक करा.



खाली दाखविल्याप्रमाणे एक विंडो ओपन होईल. नवीन नाव द्या आणि ओके बटणावर क्‍लिक करा.



थांबा! काय झालं?
इथे ओके बटणावर क्‍लिक केल्यावर काहीच झालेलं तुम्हाला दिसणार नाही. पण आता तुमची चॅनेल पॅलेट ओपन केलीत (windows> channel) तर, इथे तुम्हाला तुम्ही सेव्ह केलेला अल्फा चॅनेल दिसेल. हेच तुम्ही सेव्ह केलेलं सिलेक्‍शन.



आता सध्या सिलेक्‍ट असलेला एरिया डिसिलेक्‍ट करा (ctr+D). हाच एरिया तुम्हाला परत सिलेक्‍ट करायचा असेल तर कंट्रोल की दाबून ठेवून चॅनेल पॅलेट मधील तुम्ही सेव्ह केलेल्या अल्फा चॅनेल वर क्‍लिक करा. तुमचं सिलेक्‍शन परत दिसायला लागेल.
आहे की नाही उपयोगी. यामुळे तुमचा फक्त वेळच वाचत नाही तर तुम्ही चॅनेलच्या खूप साऱ्या फिचर्सचा उपयोग करू शकता.
हे लक्षात घ्या...
1) जेव्हा तुम्ही अल्फा चॅनेल सिलेक्‍ट करता तेव्हा पूर्ण इमेज बॅक अँड व्हाईट दिसायला लागते.



2) जो एरिया सिलेक्‍टेड असतो तो पांढऱ्या रंगात दिसतो.
3) जो एरिया सिलेक्‍टेड नसतो तो काळ्या रंगात दिसतो
4) जो एरिया काही प्रमाणात ट्रान्स्परंट आहे किंवा पूर्ण ट्रान्स्परंट आहे तो ग्रे कलरच्या शेड्‌स मध्ये दिसतो.
हा व्ह्यू खूप उपयुक्त ठरतो. कारण या व्ह्यू मध्ये तुमच्या सिलेक्‍शन मध्ये राहिलेल्या चुका तुम्हाला पटकन दिसतात. आणि त्या असतील तर लेव्हल्स ऍडजेस्ट करून (Image>Adjustments>Levels) किंवा सिलेक्‍टेल एरिया शार्पन करून (filter>Sharpn>Smart Sharpen) त्या तुम्ही पटकन काढून टाकू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अधिकाधिक फिल्टर्स आणि इमेज ऍडजेस्टमेंट टूल्स तुम्ही या व्ह्यूमध्ये वापरू शकता आणि याचा फायदा घेऊन अनेक गमतीदार आणि उपयुक्त इफेक्‍ट क्रिएट करू शकता.
आणि हो... महत्त्वाची गोष्ट राहिलीच. अल्फा चॅनेल सिलेक्‍ट असताना तुम्ही पेंट ब्रश, पेंट बकेट, किंवा पेन्सिल टूल वापरून तुमच्या सिलेक्‍शनचा आकारही बदलू शकता. तुम्ही जर ब्लॅक कलर फिल केलात तर, सिलेक्‍टेट एरिया डिसिलेकट होईल. जर व्हाईट फिल केलात तर तो एरिया सिलेक्‍ट होईल. आणि ग्रे कलर मुळे हा एरिया अर्धपारदर्शक (semo-transparent) होईल.

Saturday, September 20, 2008

कोरल ड्रॉ मध्ये मराठीत ऑपरेटींग करताना.

बऱ्याच वेळा कोरल मध्ये मराठीत ऑपरेटींग करताना गार्बेज येते ..... नव्यानी कोरल वापरणाऱ्या मित्रांना येणारी ही नेहमीचीच अडचण. उपाय अगदी सोप्पा. मी पुढे सांगितल्याप्रमाणे करत जा. आणि बघा तुम्हाला भेडसवणारा हा प्रश्‍न कसा चुटकासरशी सुटतो ते.
मेन्यू बार मध्ये टूल्स ऑप्शन सिलेक्‍ट करून खाली आलेल्या सबमेन्यूतल्या ऑप्शन वर क्‍लिक करा किवा डायरेक्‍ट ctr+J ही शॉर्टकी वापरा.

ऑप्शनची विंडो ओपन होईल. त्यामध्ये डाव्या बाजूला दिलेल्या कॅटॅगरीज पैकी टेक्‍स्ट ऑप्शनवर क्‍लिक करा. टेक्‍स्टशी संबंधीत पॅरेग्राफ, फॉन्ट्‌स, स्पेलिंग आणि क्विक करेक्‍ट असे चार सबमेन्यू दिसतील.

आता या सबमेन्यूतील स्पेलिंग या ऑप्शनवर क्‍लिक करा. शेजारच्या विंडोत स्पेलिंगशी रिलेटेड सेटींग्ज दिसायला लागतील. यापैकी सर्वात पहिला ऑप्शन परफॉर्म ऑटोमॅटीक स्पेल चेकींग हा डिसेबल करा. आता परत टेक्‍स्टशी रिलेटेल चौथा सबमेन्यू क्विक करेक्‍ट सिलेक्‍ट करा. उजव्या बाजूला शेजारच्या विंडोत त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन्स दिसतील. याविंडोत दिसणारे सर्व ऑप्शन्स डिसेबल करा.


करा आता मराठीत ऑपरेटींग .... गार्बेजशिवाय.....
तुमच्याकडे असलेल्या टिप्सही कळवा... कॉमेंट करा...

Friday, September 19, 2008

राईट’-क्लिकचा ‘रॉंग’ वे!



काही वेळा आपण एखाद्या साईटमध्ये किंवा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये वापरण्यासाठी महत्प्रयासाने शोधलेली इमेज सेव्ह करायला जातो आणि Right-Click Function Disabled! असा मेसेज येतो. अशा वेळी त्या साईटला आणि साईट अॅडमिनिस्ट्रेटरचा उद्धार करून आपण पुन्हा एकदा शोधप्रक्रिया सुरू करतो. इमेज सापडते, पण याला त्या इमेजची सर नाही, असे म्हणत नाईलाजाने ती इमेज वापरावी लागते. अशा वेळी जावास्क्रिप्टची एक ओळ वापरून ‘रॉंग’ वेने तुम्ही ‘राईट’-क्लिक करू एनेबल करू शकता. राईट-क्लिक फंक्शन डिसेबल करण्यासाठी साईट अॅडमिनिस्ट्रेटर जावास्क्रिप्टचा वापर करतात. सर्वसामान्य वेब यूजरना राईट-क्लिक करून इमेज सेव्ह करण्याची सवय असते. त्यामुळे राईट-क्लिक डिसेबल्ड असा मेसेज आल्यानंतर इमेज सेव्ह करण्याचे सर्व मार्ग संपले, असे म्हणून ते त्यापासून दूर जातात. बऱ्याच साईट्स सुरक्षिततेसाठी राईट-क्लिक डिसेबल करतात किंवा त्यांनी सदर इमेजेस अधिकृतरित्या विक्रीस ठेवालेल्या असतात. त्यामुळे ज्यांना त्या वापरायच्या आहेत त्यांनी त्या अॉनलाईन विकत घ्याव्या, अशी त्यांची अपेक्षा असते. पण काही कारणांमुळे ते शक्य नसल्यास आपण त्या साईटसाठी राईट-क्लिक एनेबल करू शकतो. तसे करण्याची पद्धत अशीः
१. सर्वप्रथम तुम्हाला जी इमेज सेव्ह करायची आहे, त्या पेजवर जा. इमेजवर राईट-क्लिक केल्यास फंक्शन डिसेबल्ड असा मेसेज येईल.
२. त्याच पेजवरील अॅड्रेसबार मध्ये पुढे दिलेला कोड पेस्ट करून एंटर करा -
javascript:void(document.oncontextmenu=null)
३. आता पुन्हा राईट-क्लिक करून पाहिल्यास ते फंक्शन अॅक्टिव्ह झाल्याचे लक्षात येईल. सेव्ह इमेज वर क्लिक केल्यास हवी ती इमेज तुम्ही हार्डडिस्कवर सेव्ह करू शकाल.


(वि.सू.ः या पद्धतीचा अवलंब करून इमेज सेव्ह केल्यानंतर कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात, याची जाणीव ठेवावी.)


With Thanks from Amit :
http://sasotechnology.blogspot.com/

Thursday, September 18, 2008

ऑटो कॅडची फाईल कोरल मध्ये इम्पोर्ट करताना....

नमस्कार मित्रांनो,
आजची पोस्ट कोरल ड्रॉशी संबंधीत पण प्रत्यक्ष डिझाईनशी संबंधीत नाही. अगदी छोटी आहे, पण हे जर का माहित नसेल तर ऐन वेळेला तोंडचं पाणी पळवणारी आहे. आणि ही माहिती पोस्ट करायला कारणही तसंच घडलं. दोन दिवसांपूर्वी एका मित्राचा फोन आला की त्याच्याकडे एका बिल्डरच्या नव्या साईटचं ब्रोशर डिझाईनचं काम आलंय आणि त्यानी दिलेल्या प्लॅनच्या PDF फाईल्स कोरलमध्ये एम्पोर्ट करताना एरर येतीये. डेडलाईन जवळ आलेली आणि सगळे उपाय थकलेले.... (अर्थात PDF वरून JPEG वगैरे वगैरे करून बघण्याचे प्रयत्न झाले, पण शेवटी व्हेक्‍टर ते व्हेक्‍टर) आणि ऑटो कॅडची फाईल काही केल्या इम्पोर्ट होत नव्हती... काय बरं कारण असावं... उत्तर अगदी सोपं आहे.
ऑटोकॅडमध्ये तयार केलेली फाईल ही बऱ्याच वेळा आकारानी खूप मोठी असते. (फाईल साईज नव्हे... लांबी आणि रुंदी) आणि आपण कोरल ड्रॉमध्ये इम्पोर्ट करताना पेपरसाईज A4 किंवा A3 साईज सवईप्रमाणे घेतो. मात्र याठिकाणी तुम्हाला पेज साईज मोठा घ्यावा लागतो. (उदा. 50 फूट बाय 50 फूट, 80 फूट बाय 80 फूट किंवा गरजेनुसार) आणि आता जर तुम्ही हा ऑटो कॅडची फाईल इम्पोर्ट केलीत तर इम्पोर्ट व्हायला वेळ लागेल पण इम्पोर्ट नक्की होईल.
अर्थात मला ही गोष्ट अशीच एक फाईल इम्पोर्ट करताना अपघातानेच कळाली. तुम्हालाही या संबंधी काही माहिती असेल किंवा तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर जरूर लिहा, कॉमेंट करा. इंग्रजीत लिहीलं तरी चालेल. शेवटी काय तर या छोट्या छोट्या गोष्टीही माहित असणं खूप गरजेचं असतं. तेव्हा जरूर लिहा.

Wednesday, September 17, 2008

फोटोशॉपः "डबलक्‍लिक'ची पॉवर

एकदा का तुम्ही फोटोशॉपला निर्ढावलात की काही किबोर्ड शॉर्टकटही वेळखाऊ वाटू लागतात. यासाठी OPEN व SAVE या फंक्‍शन्स साठी फोटोशॉपमध्ये डबलक्‍लीकची सोय दिलेली आहे. आज या पहिल्या पोस्टमध्ये आपण त्याची माहीती घेऊ. (ही सोय फक्त विंडोज युजर्ससाठी आहे. "मॅक' वर फोटोशॉपसाठी वर्क एरियाच नसतो. त्यामुळे हे डबलक्‍लिकचे शॉर्टकट "मॅक' युजर्सना वापरता येत नाहीत.)

हे सर्व घडते ते फोटोशॉपच्या वर्क एरिया मध्ये डबलक्‍लिक केल्यावर. त्यामुळे आधी वर्क एरिया म्हणजे काय याची थोडक्‍यात माहिती घेऊ.

फोटोशॉप सुरू केल्यावर ज्या रिकाम्या भागात फाईल ओपन होते तो भाग किवा दूसऱ्या भाषेत डॉक्‍यूमेंट विंडोच्या मागील ग्रे रंगातील भाग म्हणजे वर्कएरिया. (The work area is the Gray area behind the document window).



1) वर्कएरियामध्ये डबलक्‍लिक केल्यास Open Document ही विंडो ओपन होते.
2) कंट्रोल की दाबून ठेवून वर्कएरियावर डबलक्‍लीक केल्यास New Document ही विंडो ओपन होते.
3) अल्ट की दाबून ठेवून वर्कएरियावर डबलक्‍लिक केल्यास Open As ही विंडो ओपन होते.
4) शिफ्ट आणि कंट्रोल की दाबून ठेवून वर्कएरियावर डबलक्‍लिक केल्यास ओपन असलेली फाईल Save होते.
5) शिफ्ट की दाबून ठेवून वर्कएरियावर डबलक्‍लिक केल्यास ऍडोब ब्रिज आणि फाईल ब्राऊजर ओपन होतो. (CS2)

जर डबलक्‍लिक केल्यावर काही घडत नसेल तर पुढील गोष्टींची खात्री करा.
1. तुम्ही वर्क एरियातील मोकळ्या जागेतच क्‍लिक करत आहात ना?
2. तुम्ही चुकून टूल बार वर किंवा ओपन असलेल्या डॉक्‍यूमेंटवरतर क्‍लिक करत नाही?
आज पहिल्या पोस्टमध्ये इतकेच.
यापैकी पहिला डबलक्‍लिकचा शॉर्टकट बऱ्याचजणांना माहित असतो. पण बाकीच्यांचा वापर माहित नसल्यामुळे होताना दिसत नाही. हे शॉर्टकट वापरून बघा. तुमचा काही वेळ नक्की वाचेल. आणि हो, तुम्हाच्याकडेही अशी काही माहिती असेल तर जरूर कळवा अथवा कॉमेंट करा. शेअर केल्याने आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल नाही का?