Showing posts with label Infographics or Information Graphics. Show all posts
Showing posts with label Infographics or Information Graphics. Show all posts

Friday, October 10, 2008

इन्फोग्राफिक्‍स-3 (5W1h)

नमस्कार दोस्तांनो,

इन्फोग्राफिक्‍स म्हणजे काय? आणि त्याचा वापर कशासाठी आणि कुठे होतो हे आपण याआधीच्या दोन पोस्ट्‌स मध्ये बघितले. आता प्रत्यक्ष इन्फोग्राफिक्‍स करायचं कसं आणि ते करताना काय काळजी घ्यायची हे बघूयात. पण.... त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे. चांगलं इन्फोग्राफिक्‍स तयार करण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या बघण्यात आलेली इन्फोग्राफिक्‍स चांगली की वाईट हे कळालं तर ते जास्त चांगलं आहे. चांगलं इन्फोग्राफिक्‍स कसं ओळखायचं यासाठी जरा आपल्याला वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमाचा आधार घेतला पाहिजे.

जर्नालिझमचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी कोणती यासाठी एक सुत्र शिकवलं जातं. ते म्हणजे 5w1h. आता तुम्ही म्हणाल की झालं परत झेंगट सुरू. पण हे अगदी सोप्पं आहे. हे 5W म्हणजे....

1) what ?

2) where?

3) when?

4) why?

5) who?

आणि 1h म्हणजे How?

एखादी बातमी लोकांना अगदी व्यवस्थित कधी कळते तर जेव्हा या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतात तेव्हाच. म्हणजेच त्या बातमीतून काय, कुठे, कधी, का, कोणी आणि कसं हे वाचताक्षणीच कळालं पाहिजे. हाच नियम चांगल्या इन्फोग्राफिकलाही लागू पडतो. आहे ना सोप्पं.

आता हे पुढे दिलेलं ग्राफिक बघा. न्यूजविकचे आर्ट डिरेक्टर कार्ल गुड यांनी हे केलेले आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष डिक चेनी हे शिकारीला गेले असताना त्यांनी चूकून त्यांच्या सहकाऱ्यावरच शॉटगन मधून गोळी झाडली. ही सगळी घटना कार्ल गुड यांनी इन्फोग्राफिकमधून दाखवली आहे. यात 5W1H अगदी योग्य प्रकारे वापरले आहे. हे ग्राफिक बघितवल्यावर वाचकाला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. फायनल इन्फोग्राफिक करण्याआधी कार्ल गुड यांनी त्यासाठी केलेले रफ स्केच पण सोबत दाखवत आहे. तुम्ही इन्फोग्राफिक करण्याआधी केलेले रफ स्केच आणि तुमचे फायनल ग्राफिक यात जर साम्य असेल तरच तुम्ही केलेले ग्राफिक परिपूर्ण होते. खाली दिलेले ग्राफिक त्यादृष्टीने नीट बघा.


Click on the Graphic to Enlarge.

Click on the Graphic to Enlarge.

चला तर मग आजपासून वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या इन्फोग्राफिक्‍सची चिरफाड सुरू करा.

पुढच्या पोस्टमध्ये आपण इन्फोग्राफिक्‍सचे उद्दीष्ट्य काय? आणि इन्फोग्राफिक्‍सचे काही प्रकार जे आम्ही वापरतो यांची माहिती घेऊ. भेटू यात तर परत. इथेच लवकरच! तुम्हाला काही प्रश्‍न अथवा शंका असतील तर जरूर कळवा.

kiran.velhankar@gmail.com

Tuesday, September 30, 2008

इन्फोग्राफिक 2

आता थोडक्‍यात इन्फोग्राफिक म्हणजे काय हे तुम्हाला कळालं असेल असं गृहीत धरतो. तसं बघितलं तर इन्फोग्राफिकची सुरुवात फार पूर्वीपासून झाली असं म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ म्हणजे खाली दिलेलं चित्रे पाहा.




जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची याने काढलेली ही चित्रे. कोणतीही आधुनिक सामग्री उपलब्ध नसताना हे अशा प्रकारचे परफेक्‍ट ड्रॉइंग काढणे म्हणजे.. केवळ ग्रेट! चित्र आणि माहिती (शब्द) यांचा एकत्रित वापर इथे बघायला मिळतो.
क्‍लिष्ट, सहजपणे न कळणाऱ्या गोष्टी सोपेपणाने इन्फोग्राफिक्‍सच्या माध्यमातून मांडता येतात. परंतु, केवळ लिखित मजकूर जशाच्या तशा "इलस्ट्रेशन'च्या स्वरूपात मांडणे म्हणजे "इन्फोग्राफिक' नव्हे. माहितीची सुत्रबद्ध मांडणी, त्यातील घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध याद्वारे सुसंबंधित माहिती वाचकांपर्यंत पोचविणे "ग्राफिक्‍स'मध्ये अपेक्षित आहे. तुम्हाला सगळ्यांना सध्या चर्चेत असलेला ग्रीन हाऊस इफेक्‍ट किंवा मराठीत हरितगृह परिणाम याची माहिती असेल. पण आता ही सगळी शास्त्रीय माहिती म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्‍ट म्हणजे नक्की काय? तो कशामुळे होतो? त्याचा परिणाम पृथ्वी, मानव, वनस्पती यांच्यावर काय होतो. हे सगळं शब्दांत सांगायचं म्हणजे????? नकोच ते.
हीच माहीती इन्फोग्राफिकच्या माध्यमातून लोकांपुढे मांडली तर ती किती सोपी होते ते खालच्या चित्रात पाहा.



नुसती माहितीच नाही तर, एखादी घटनासुद्धा तुम्ही ती घटना कशी घडली हे इन्फोग्राफिकच्या माध्यमातून लोकांना दाखवू शकता. खालील चित्र पाहा. World Trade Center झालेल्या हल्ल्यांची घटना सांगणारे हे इन्फोग्राफिक आहे.



आज एवढंच. आता पुढच्या पोस्टपासून इन्फोग्राफिक्‍सचे प्रकार कोणते? ते तयार करताना काय काळजी घ्यावी लागते याची माहिती घेऊ.

Tuesday, September 23, 2008

इन्फोग्राफिक्‍स...

नमस्कार दोस्तांनो...

तुमच्यापैकी जे आर्टिस्ट वर्तमानपत्राशी संबंधित आहेत ते या शब्दाशी परिचित असतील. इतरांना हा प्रकार माहित असण्याचं फारसं कारण नाही; पण इन्फोग्राफिक हा प्रकार इतका इंटरेस्टिंग आहे की बस. पण त्यासाठी इन्फोग्राफिक म्हणजे काय ते कसे तयार करायचे आणि ते कसे बघायचे या सगळ्यामागे एक शास्त्र आहे. थांबा! घाबरू नका शास्त्र म्हणजे थोडं अवघड होतय ना!. मग आपण त्याला पद्धत असं म्हणू. एकदा की ही पद्धत तुम्हाला समजली की झालं. तुम्ही माझ्याइतकाच त्याचा आनंद घ्यायला लागाल. मला स्वतःला इन्फग्राफिक्‍समधले फार काही कळत नव्हतं. "सकाळ'मध्ये न्यूजपेपर आर्टिस्ट म्हणून काम करताना प्रसिद्ध इन्फोग्राफर पीटर आँग आणि 'न्यूज विक'चे आर्ट डिरेक्‍टर कार्ल गुड यांच्याबरोबर त्यांच्या वर्कशॉपमध्ये, सेमिनारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलून गेला.
फार बडबड झाली नाही का.... आता प्रत्यक्ष विषयाकडे जाऊ.. (एका किंवा दोन पोस्टमध्ये हा विषय कव्हर होणारा नसल्यामुळे तुम्हाला बऱ्याच संयमाची आवश्‍यकता आहे.)


इन्फोग्राफिक म्हणजे काय?

इन्फोग्राफिकची अगदी सोपी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल..चित्र, शब्द आणि छायाचित्र यांची एकत्रितरित्या केलेली मांडणी म्हणजे इन्फोग्राफिक की ज्याद्वारे वाचकाला, तो वाचत असलेल्या गोष्टीची माहिती कमीत कमी शब्दात आणि कमी वेळेत पण अधिक चांगली मिळावी. आता तुम्ही म्हणाल की हे का झेंगट आहे? थांबा, उदाहरणासह सांगतो. ज्यावेळी अॅपल कंपनीनी आयफोन लॉंच केला त्यावेळी संपूर्ण जगभरात त्याविषयी उत्सूकता होती. आता जर का मला ही माहिती तुम्हाला शब्दांत सांगायची झाली तर एकवेळ भरपूर मोठ्ठी माहिती मी लिहू पण शकेन पण.... ती तुम्हाला वाचायला आवडेल? आणि ती किती समजेल? पण समजा हीच माहिती मी तुम्हाला दाखलवी तर?????... हेच इन्फोग्राफिक.. खालील इन्फोग्राफिक बघा.


यामध्ये आयफोन कसा आहे? तो कसा दिसतो? त्याची वैशिष्टे काय? ही सगळी माहिती आहे पण मुख्य म्हणजे ती तुम्हाला दिसतीये सुद्धा. एखादी माहिती शब्दांतून सांगण्यापेक्षाती प्रत्यक्ष दाखवणं म्हणजेच इन्फोग्राफिक..... हूशऽऽऽऽऽऽ... आज इथेच थांबू. पुढील माहिती लवकरंच... विषय आवडला असेल (नसेल) तर जरूर कॉमेंट करा. किंवा मेल करा.. kiran.velhankar@gmail.com