आजपर्यंत आपण देवनागरीची मुळाक्षरे, जोडाक्षरे आणि अंक यांची वळणे कशी आहेत, ती कशी काढावीत याची माहिती घेतली. आकृत्यांमध्ये दिलेल्या बाणांच्यानुसार सराव करणे सोपे गेले असेल अशी आशा आहे. आता प्रत्यक्ष देवनागरी लिखाणाकडे वळू. अक्षरांच्या वळणांबद्दल सांगण्यासारखे आता काही राहिले असेल असे वाटत नाही. पण प्रत्यक्ष लिखाण करताना फक्त अक्षरांची वळणे आली म्हणजे झालं असं अजिबात नाही. या अक्षरांच्या वळणांबरोबरच दोन अक्षरांतील अंतर, दोन शब्दांतील अंतर आणि दोन ओळींतील अंतर किती पाहिजे याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. आजपासून आपण ही अंतराची माहिती घेणे सुरू करू.
दोन अक्षरांतील अंतर
अक्षरे लिहीताना ती एकमेकांना चिकटलेली नसावीत. त्यात मोकळेपणा असावा. हा मोकळेपणापण जास्त नसावा; तर हा मोकळेपणा किती असावा याचेही प्रमाण ठरलेले आहे. कटनीब, बोरू किंवा मार्करने अक्षरलेखन करताना एका कान्याएवढे अंतर दोन अक्षरांत असणे आवश्यक आहे. मात्र काही अक्षरांची रुंदी ही कमी- जास्त असते. (उदा. व, र आणि क, ख यांची रुंदी) त्यावेळी हे अंतर डोळ्यांना चांगले दिसेल एवढे असावे. अर्थात त्यासाठीजी नजर तयार करण्यासाठी सराव आवश्यक आहेच. साध्या पेनाने लिहीताना ते बदलेल. एकदा का कटनीब किंवा बोरूने लिखाणाचा सराव केलात तर साध्या पेनानं लिहिताना किती अंतर सोडावे याचा अंदाज तुम्हाला सहज येईल. कटनीब, बोरू किंवा मार्करने सुलेखन करताना किती अंतर सोडावे हे दर्शविणारी आकृती खाली दिली आहे.
उद्याच्या पोस्टमध्ये दोन शब्दांमधील अंतराची माहिती घेऊ.
Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com
1 comment:
Interesting blog sir,Found ur blog in indiblogger,interested in exchanging links with me?visit my blog for free quality blogger templates
www.templateit.blogspot.com
Post a Comment